पैठण : ईसारवाडी ता.पैठण येथे दोन गटात मंगळवारी रोजी लाठ्या काठ्याने मारहाण झाली होती. यामध्ये पंचायत समिती सदस्य संतोष माळी हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले आहे. इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार दि.१६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली असून याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सहा आरोपी पैकी चार आरोपींना तत्काळ अटक केली आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईसारवाडी येथील पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनी यांच्या मुलीचा विवाह गावातीलच बाळू शिंदे यांच्याशी तीन वर्षापूर्वी झाला होता. मात्र माळी यांच्या मुलीला बोलता व ऐकू येत नसल्याच्या कारणावरून पती बाळू शिंदे सह सासू,सासरे व घरातील इतर मंडळी त्रास देत होते. मंगळवार १६ जुलै रोजी संतोष माळी यांचा मुलगा सागर माळी याला मुलीला घेऊन येण्यासाठी पाठवले होते. मात्र त्यांनी तुझ्या आई वडीलांना पाठव असे म्हणून सागरला वापस पाठवले. मात्र काही वेळातच संतोष माळी व बाळू शिंदे यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले व संतोष माळी यांना आरोपी नामदेव सावंत, गणेश सावंत, आकाश शिंदे ,बाळू शिंदे,गोकूळ शिंदे, नागू शिंदे, यांनी संगणमत करून संतोष माळी, दत्तू माळी, अशोक माळी यांना लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्राने मारहाण केली. यामध्ये पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दत्तू माळी हे सुद्धा गंभीर जखमी असून यांच्या वर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे. तसेच, या घटनेत आरोपी नामदेव सावंत, गणेश सावंत हे सुद्धा गंभीर जखमी असून त्यांच्यावर सुध्दा उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दत्तू माळी यांच्या फिर्यादीवरून सहा आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी चार आरोपी आकाश शिंदे ,बाळू शिंदे, गोकुळ शिंदे,नागू शिंदे, यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावंडे, पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार विद्या झिरपे, फौजदार विठ्ठल आयटवार,शरद पवार, रामेश्वर तळपे, पंडित, संजय सपकाळ, राहूल बचके करीत आहे.